
” मी फक्त श्रवणयंत्राविषयी माहिती काय विचारली आणि मला रोज श्रवणयंत्र देणाऱ्या वेगवेगळ्या केंद्रांतून फोन यायला लागला”
मला रोज वेगवेगळ्या नंबरावरून संदेश येतात, मला श्रवणयंत्रांविषयी भरभरून माहिती पाठवली जाते, मला श्रवणयंत्रांवर इतकी सूट, तितकी किंमत असे संदेश मिळतात. घरी यायला तयार होणारे, त्याकरीता काहीही मानधन न घेणारे, श्रवणयंत्राची अत्यंत वाजवी किंमत, आकर्षक सूट देणारे संदेश बघून एखादयाला मोह वाटणं स्वाभाविक आहे. घरबसल्या काम, वाजवी दर, भरघोस सूट- – हे जरा आखुड शिंगी, बहुदुधी गाईसारखं वाटत नाही? जी खर तर अस्तित्वातच नसते.
‘श्रवणयंत्र’ ही अशी झटपट घेऊन टाकण्याची वस्तू नव्हे. श्रवणयंत्र घेण्याच्या निर्णयाप्रत येणारी व्यक्ती आणि पर्यायाने त्याचं कुटुंब हे बरेच आधीपासून गरज, विचार, चौकशी, मतं, दुसऱ्यांचे अनुभव ह्या कोलाहलातून तरून आलेलं असतं. मनात करू, नको करू, फायदा होईल, नाही होईल, वापरीन का ठेवून देईन, उपयुक्त असेल, नसेल असं द्वंद्व चालूच असतं. त्यात कोणीतरी घरी येतं, ज्यांचा तसा तर कुठलाच ठावठिकाणा नसतो, असला तरी कुठलातरी लांबचा पत्ता असतो. तो माणूस तुमच्या घरच्याच वातावरणात (गोंगाट, आवाज, वर्दळ, इतरांचा वावर) श्रवणालेख काढतो. खरतर श्रवणालेख फक्त श्रवणतज्ञच (Audiologist) काढू शकतात. पण घरी येणारा माणूस हा बहुतेकदा Audiologist नसतो.
तो श्रवणालेख काढतो पण तो हातात रिपोर्ट देत नाही कारण याला माहित असतं ते कायदेशीर नाही मग तो माणूस आधी ठरवून आल्याप्रमाणे त्याच्या बॅगेतून श्रवणयंत्र काढतो. तुम्हाला लावतो, तुमच्याशी बोलतो. अनेकदा, दीर्घ काळ कमी ऐकू येणा-या माणसाला, हा मोठा आवाज भावतो, सुखावतो. गोंगाट ऐकू आला, इतर त्रासदायक आवाज आले तरी ते येण्याचे कारण न समजवताच, “अहो हळूहळू तुम्हाला सवय होईल” असे तुम्हाला व कुटुंबियांना समजावलं जातं, सगळ्यांनाच ते पटत. व्यवहार होतो. कसे वापरायचं, काळजी कशी घ्यायची हयाची जुजबी माहिती दिली जाते.
नंतर श्रवणयंत्र वापरायला लागल्यावर काही काही गोष्टी जाणवायला लागतात :
- कानात बसतच नाहिये, भांड्यांचे आवाज मोठे आणि बोलण्याचा आवाज लहान येतो आहे,
- टिव्हीवरचे संवाद कळतच नाहियेत इ.
आणि मग तुमच्या तक्रारीसाठी तुम्ही जेव्हा फोन करता तेव्हा या माणसाचा तुमच्या शहरात येण्याचा ठराविक वार आणि ठराविक वेळ आहे ही माहिती तुम्हाला नव्याने समजते तेव्हा तुम्ही हताश होता, श्रवणयंत्र प्रकारच चांगला नाही म्हणून त्यालाच दोष देता.
काय बोध घ्यायचा वरच्या कथनातून ?
- श्रवणालेख (Audiogram) तज्ञ व्यक्तीकडूनच (Audiologist) काढून घ्यावा.
- आपला श्रवणदोष कसा आहे. त्याबद्दल अधिक माहिती समजून घ्यावी.
- तुमच्या मनातल्या, श्रवणदोष आणि श्रवणयंत्राबद्दलच्या शंकांचं तज्ञ व्यक्तीकडून निरसन करून घ्यावं.
- श्रवणयंत्राची उपयुक्तता सगळेच सांगतील पण त्याच्या मर्यादा तुम्हाला फक्त तज्ञ व्यक्तीच सांगू शकेल.
- तुमच्या गरजेप्रमाणे, श्रवणदोषानुसार, वापरण्याच्या सुविधेनुसार तुमच्या साठी कोणकोणती श्रवणयंत्रे योग्य आहेत हे समजून घ्यावे.
- श्रवणयंत्राविषयी लागणारी सर्व प्रकारची मदत, मार्गदर्शन तुमच्या निकडी प्रमाणे मिळते की नाही हयाची तपासणी करावी.
घरात येऊन श्रवणयंत्र देणारे तुमच्या ऐकण्याच्या प्रवासात तुमचं बोट धरायला असतीलच असे नाही. त्यांनी दिलेल्या ठावठिकाण्यावर ते भेटतील का? तुमच्या अडचणी दूर करण्याचं प्रशिक्षण वा कौशल्य यांच्याकडे आहे का ? रोजच्या वापराने जेव्हा केंव्हा श्रवणयंत्रात बिघाड होतो तेंव्हा त्याच्या दुरुस्तीकरीता, विकताना दाखवलेली तत्परता ते दाखवतील का ?
लक्षात घ्या :
- श्रवणयंत्र वापरायला लागल्या नंतर सुद्धा श्रवणतज्ञांची गरज लागते.
- आता प्रत्येकाने ठरवायचे की पुढील ४ ते ५ वर्षे वापरु शकू असे श्रवणयंत्र घ्यायचे आहे का आत्ताची वेळ भोगले इतपतच तात्पुरती सोय करायची आहे ते.