
श्री पाटील म्हणाले अहो साधसं, आवाज मोठा करणार यंत्र द्या. मी एक साधसं श्रवणयंत्र त्यांना दिलं, त्या यंत्रात जे काही मर्यादित, अडजस्टमेंट शक्य होत्या त्या केल्या. सौ पाटील त्यांना काही विचारत होत्या. त्यातलं त्यांना काही समजल, काही नाही समजल. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. त्यांना ऐकू यावा म्हणून श्री. पाटीलांनी मुळातच त्याचा आवाज मोठा ठेवला होता, तो आवाज प्रचंड मोठा आणि त्रासदायक वाटला. त्यांच्या मुलाने मागे उभे राहून काही प्रश्न विचारले, पण श्री पाटीलांना ते नीट समजलेच नाहीत.
आवाज फक्त मोठा झाला आणि ऐकू आला म्हणजे बोललेलं समजतं अस नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वातावरणात बोललेलं समजलं तसेच ऐकण्याचा आरामदायक अनुभव आला तरच श्रवणयंत्र वापरले जाते.
मी त्यांना म्हंटले आता एक दुसरे श्रवणयंत्र लावूया, बघूया, तुम्हाला काही फरक वाटतो का?
श्री पाटीलांना दुसरे श्रवणयंत्र लावलं. यात वापरलेल्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे आवाज मोठा करण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. हया श्रवणयंत्रात मायक्रोफोन वर पडणारा आवाज कसा आहे, म्हणजे हळू, मध्यम, (नेहमीच्या संभाषणाच्या पातळीतला) का मोठा; हे श्रवणयंत्र ओळखतं व हळू आवाजाला अधिक, मध्यम आवाजाला मध्यम आणि मोठ्या वा तीव्र आवाजाला अत्यंत माफक प्रमाणात मोठे केले जाते त्यामुळे साधारणपणे आवाजाचा बटणाला हात लावण्याची वापरणाऱ्या व्यक्तीला गरजच पडत नाही (मोठा आवाज तत्क्षणी सौम्य बनवला जातो, तसेच हळू आवाज समजेल इतका मोठा)
रस्त्यावर, मार्केटमध्ये, एखादया कार्यक्रमात, थोडक्यात गोंगाटाच्या ठिकाणी आजूबाजूचा गोंगाट सौम्य करण्याची सोय तर फारच उपयुक्त ठरते कारण दिवसभर आपल्यापैकी कोणीच कधीच एकाच वातावरणात राहात नसतो.
वेगवेगळ्या वातावरणात बोलण्याचा आवाज अधिक स्पष्ट, गोंगाट अधिक सौम्य करण्यासाठी तर सर्वच कंपन्या आधुनिक तंत्रज्ञान वापरतात जसे…
- आजूबाजूच्या गोंगाटाच्या आवाजात, समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा आवाज अधिक स्पष्ट करण्याची सोय आजकालच्या काही श्रवणयंत्रांमध्ये असते. इतकच नव्हे तर जी श्रवणयंत्रे आधुनिक तंत्रप्रणाली वापरतात, त्यात ते श्रवणयंत्र स्वतःहूनच ओळखते की बोलण्याचा आवाज कुठल्या दिशेने येतो आहे व तोच आवाज मोठा केला जातो.
- ह्या श्रवणयंत्रातून, श्री पाटील यांना त्यांच्या पत्नीने बोललेलं ऐकू आले. फोनचा आवाजच नाही तर दार जोरात बंद झाल्याचा आवाज सुद्धा त्रासदायक वाटला नाही. मुलाने त्यांच्या मागे उभे राहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली.
- म्हणजेच श्रवणयंत्राने नुसता आवाज मोठा करून भागत नाही. मोठा केलेला आवाज सुधारून, त्या व्यक्तीच्या श्रवणदोषानुसार त्यात फेरफार करू शकणारे, तंत्रज्ञान त्या श्रवणयंत्रात असणे आवश्यक आहे.
आवाज फक्त ऐकू आला म्हणजे बोललेलं समजतं अस नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वातावरणात बोललेलं समजणं तसेच एकण्याचा ताणरहित अनुभव मिळाला तरच श्रवणयंत्र वापरले जाते.